जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काल सायंकाळी वादळी पावसाने तडाखा दिला असून काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या आपत्तीत नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वार्यासह पावसाने तडाखा दिला. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी जलधारा कोसळल्या. तर चाळीसगाव तालुक्यासह काही तालुक्याच्या ठिकाणी तुफान गारपीट झाली. या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके आडवी पडल्याने शेतकर्यांची जबर हानी झाली आहे.
दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या नुकसानीची तातडीने दखल घेतली असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंचनामे झाल्यानंतर शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावेत असेही ना. गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिले आहेत. परिणामी, कृषी व महसूल खात्यातर्फे तात्काळ कार्यवाही सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.