जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या अतिपावसामुळे खरीपातील कपाशी पिकाचे बोंडे उमलण्याआधीच कोमजल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. दरम्यान, याबाबत ‘जळगाव लाईव्ह’ ने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते. यावृत्ताची कृषी विभागाने दाखल घेत तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबतची माहीती सादर करण्याचे आवाहन केले आहे.
अतिवृष्टी तथा अतिवृष्टीसदृश्य परीस्थिती तसेच गुलाब वादळ यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे झालेल्या पीकनुकसानीबाबत सर्व विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत सूचना देण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी केले आहे. १८००१०३७७१२ या टोल फ्री क्रमांकावरून किंवा क्राॅप इन्शुरन्स ऍप वरुन (https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerappcentral) शेतकऱ्यांना आपल्या सूचना दाखल करता येणार आहेत. भारती एक्सा कंपनीचे प्रतिनिधी भुषण सपकाळे यांच्यामार्फत तसेच तालुका कृषी कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने आपला विमा अर्ज शेतकऱ्यांना सादर करता येणार आहे. सर्व विमाधारक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहीती विमा कंपनीस द्यावी व याविषयी अधिक माहीतीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मुक्ताईनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविणार अहवाल
दरम्यान, या नुकसानीबाबत विमाधारक तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला नाही त्यांच्या नुकसानीबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राथमिक अहवाल लवकरच पिठविला जाईल, असे मुक्ताईनगरचे नायब तहसिलदार निकेतन वाले यांनी ‘जळगाव लाईव्ह’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
लवकरच पाठविला जाईल
अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच पाठविला जाईल.
– निकेतन वाले,नायब तहसिलदार मुक्ताईनगर
कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा
तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानीबाबतची माहीती ७२ तासाच्या आत विमा कंपनीस द्यावी. अधिक चौकशीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
– अभिनव माळी, तालुका कृषी अधिकारी