जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात मंगळवारी (२८ सप्टेंबर) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज रविवारी आणि उद्या सोमवारी जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर गुलाब नावाच्या चक्रीवादळात झाले असून यामुळे महाराष्ट्रात येत्या तीन ते चार दिवसांसाठी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला रविवार आणि सोमवारसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले असून मंगळवारी जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
सुरवातीला रुसलेल्या पावसाने जिल्ह्यात मागील महिन्यापासून दमदार हजेरी लावली. मागील गेल्या ४ ते ५ दिवसापासून पावसाने काहीसी विश्रांती घेतली होती. परंतु आता पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी तर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर बुधवारी जिल्ह्याला ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यातील बहुतांश धरण फुल भरली आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघुर धरण देखील फुल भरले धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गिरणा धरण देखील फुल भरले आहे.जिल्ह्यातील बहुतांश धरण फुल भरल्याने वर्षभराचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आज रविवारी सायंकाळी ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी धडकेल. महत्त्वाचे म्हणजे हे चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे २७ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. वेगाने वारे वाहतील. कोकणात २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान वाऱ्याचा वेग वाढेल. काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल.