जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव खऱ्या अर्थाने व्यापक झाल्यावर अनेक कार्यकर्ते विविध मंडळात सक्रिय झाले. पुणे, मुंबईच्या धर्तीवर जळगाव शहरात देखील बाप्पाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक विसर्जन मिरवणूक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९८५ मध्ये मोजक्या मंडळांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक सुरु झाली आणि १९८८ मध्ये मिरवणुकीला गालबोट लागले.
जळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी नवनवीन रूप घेत होता. मंडळाचे कार्यकर्ते नवनवीन संकल्पना घेऊन आकर्षक आरास सादर करीत होते. मुंबई, पुणे सारखा सार्वजनिक गणेशोत्सव जळगाव देखील होऊ लागला होता. गणेश विसर्जन मिरवणूक जळगावात देखील सुरु व्हावी यासाठी डॉ.अविनाशदादा आचार्य, पंढरीशेठ वाणी, राजबापू शिंदे, प्रकाशशेठ जगताप अशा अनेक गणेश भक्तांनी त्यात पुढाकार घेतला.
मिरवणुकीचा मार्ग निश्चित केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला १९८५ मध्ये सुरुवात झाली. गणेश भक्तांचा जल्लोष, उत्साह, गुलालाची उधळण आणि वाद्यांच्या आवाजात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात होता. मिरवणुकीत सजीव देखावे देखील साकारले जात होते. सर्वकाही सुरळीत सुरु असताना २-३ वर्षातच १९८८ मध्ये मिरवणुकीला गालबोट लागले आणि सर्व थांबले.
दरवर्षी प्रमाणे मिरवणूक जात असताना अचानक सामाजिक तेढ निर्माण झाला आणि मिरवणूक बंद पडली. मिरवणुकीत असलेले मुकुंद मेटकर हे स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या भूमिकेत साखळदंडाने बांधलेले असल्याने ते तिथेच अडकले. सामाजिक तेढ टाळण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांकडून दोन्ही गटावर गुन्हे दाखल करण्यात आले. १९८८ मध्ये झालेल्या वादामुळे प्रत्येकाला धडा मिळाला आणि पुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विचार विनिमय सुरु झाला.