सार्वजनीक बांधकाम विभागाच्या जळगाव कार्यालयात अभियंता दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । अभियंता दिनाचे औचित्य साधून बुधवार दि. १५ रोजी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या जळगाव कार्यालयात सर मोक्षगुंडम विश्वसरैया यांना अभिवादन करण्यात आले.
सर मोक्षगुंडम विश्वसरैया यांच्या जयंतीला अर्थात १५ सप्टेंबर रोजी दरवर्षी अभियंता दिन साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून सार्वजनीक बांधकाम जळगाव विभागात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते सर मोक्षगुंडम विश्वसरैया यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता जी.एच. राजपूत, उपकार्यकारी अभियंता एस.बी. पाटील, सहायक अभियंता श्रेणी- अ सुभाष राऊत, शाखा अभियंता जितेंद्र महाजन, अभिषेक सूर्यवंशी, भूषण घुगे, भूपेंद्र रायसिंगे, राजहंस मॅडम, योगेश अहिरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अभियंता हा नवनिर्मितीचा जनक
दरम्यान, याप्रसंगी सार्वजनीक बांधकाम जळगाव विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती रूपा राऊळ-गिरासे यांनी अभियंता दिनानिमित्त शुभेच्छापर संदेश जारी केला. यात त्यांनी म्हटले आहे की, अभियंता हा नवनिर्मितीचा जनक आहे. जनमाणसांचे जीवन सुकर होण्याकरीता अभियंता वेगवेगळ्या माध्यमातून कामे करून संकल्पना साकारत असतो. सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता हे रस्ते, पूल, फ्लायओव्हर्स आदींसह इमारती बांधकाम करून भारतासारख्या विकसनशील राष्ट्राला आधुनिकतेकडे नेण्याचे मोलाचे कार्य करत आहेत, असे नमूद करत त्यांनी अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.