जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । तुषार देशमुख । चाळीसगाव येथे किराणा सामान घेण्यासाठी आलेल्या एका महिलेला दोन तरुणांनी आम्ही पोलीस आहे असे सांगत त्या महिलेकडून हातचलाखीने 52 हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत लंपास केल्याची घटना चाळीसगाव येथे घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की अशालता कल्याणसिंग चव्हाण (रा.महावीर कॉलनी जुने विमानतळ) या 7 रोजी किराणामाल घेण्यासाठी स्टेशन रोडवरील एका किराणा दुकानात आल्या होत्या. किराणामाल घेतल्यानंतर त्या दत्तवाडी भागात राहत असलेल्या वकिलाकडे जाण्यासाठी निघाल्या तर रस्त्यात त्यांना दोन भामटे काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवर येऊन भेटले व म्हणाले की आम्ही दोघे पोलीस आहे व शहरांमध्ये सध्या चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये एवढे महाग दागिने घालून बाहेर फिरत जाऊ नका. तुमची पोत तुम्ही पर्समध्ये ठेवा. असे सांगितले व ती महिला पर्समध्ये पोत ठेवत असताना द्या आम्ही ठेवतो असे ते दोघे भामटे त्या महिलेला म्हणाले.आणि त्या दोघा भामट्यांनी हातचलाखीने त्या महिलेकडील सोन्याची पोत लंपास केली.
काही अंतरावर गेल्यावर सदर महिलेच्या हा प्रकार लक्षात आला. तेव्हा तिने पोलीस स्टेशनला धाव घेतली. आणि दोघांच्या विरोधात फिर्याद दिली. आशालता चव्हाण यांच्या फिर्यादीवरून दोघं भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कॉ.राहुल सोनवणे हे करीत आहेत