जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । गिरणा आणि मन्याड नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे दोन्ही नद्यांना पाणी आले आहे. मन्याड प्रकल्पातून पाणी सोडले जात असून दुपारनंतर पाचोरा आणि भडगाव तालुक्यात पूर येण्याची शक्यता आहेत. गिरणा पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भडगाव व पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रात आज दि.३१ ऑगस्ट रोजी दुपारनंतर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तरी सखल नदीकाठावरील गुरेढोरे, जळतंन सामान ,चारा तसेच रहिवास हे तातडीने उंच जागी हलवावे व सावध असावे. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती व महसूल प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन सर्वांना अवगत करावे. असे गिरणा पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव यांनी कळविले आहे.
मन्याड प्रकल्पातून ५००० क्युसेस विसर्ग
आज मन्याड मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा १०० टक्के झालेला असुन धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मन्याड नदीला जवळपास ५००० क्युसेक्सपर्यंत पुराचे पाणी जात आहे. मन्याड व गिरणा नदीच्या काठावरील गावातील लोकांनी नदीत जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जिवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे. तसेच सर्वांनी आपली काळजी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगांव व उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगांव यांनी केलेले आहे.
ग्रामस्थांनी सतर्क रहावे
गिरणा नदीला पूर आल्यास भडगाव, बांबरूड, पुनगाव, गिरड, अंतुर्ली, भातखंडे गावांना धोका निर्माण होतो. पुराची शक्यता लक्षात नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.