खडसे-महाजनांच्या अनुपस्थित जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनलची बैठक सुरु

ऑगस्ट 30, 2021 6:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । जिल्हा बँकेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राजकीय खलबते सुरू झाली असून निवडणूक बिनविरोधसाठी सर्वपक्षीय पैनल तयार करण्याबाबत आज दुपारी अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, बैठकीला माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आ.गिरीश महाजन हेच अनुपस्थित असल्याने तूर्तास तरी सर्वपक्षीय पॅनलचे भवितव्य अधांतरीच दिसत आहे.

jdcc bank election meeting

या बैठकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला असून, या बैठकीस माजी मंत्री एकनाथराव खडसे व आ.गिरीश महाजन हे दोन्ही नेते उपस्थित राहणार होते. जिल्ह्यातील बहुतांश नेते जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आटोपून अजिंठा विश्रामगृह येथे पोहचले आहेत. बैठक सुरु होऊन देखील माजी मंत्री एकनाथराव खडसे व आ.गिरीश महाजन हे आलेले नाही.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आता सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. गेल्या पंचवार्षिक प्रमाणेच यंदाही ही निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी सर्वपक्षीय नेते आग्रही आहेत. मात्र, जागा वाटपावरून अजूनही कोणताही ठाम निर्णय अद्यापपर्यंत घेण्यात आलेला नाही. जागावाटपावर निर्णय घेण्यात यावा यासाठीच पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी पुढाकार घेऊन माजी मंत्री एकनाथराव खडसे, आ.गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देखील या बैठकीस उपस्थित राहण्याबाबत आमंत्रण देण्यात आले होते.

दरम्यान, आज दुपारी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत राज्यस्तर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने देखील स्वबळाचा नारा दिला होता. जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलवर एकमत न झाल्यास राष्ट्रवादी स्वतंत्र असेल असे एकनाथराव खडसे यांनी स्पष्ट केले होते.

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक संपल्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमची ईडी लागली आता तुमची सीडी दाखवा असे आव्हानच माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी दिले होते. दोन्ही नेते जिल्हा बँकेच्या निवडणुकीला एकत्र येण्याची शक्यता असतानाच वेगवेगळे वक्तव्य आल्याने ते बैठकीला येणार नाही असा सूर आता उमटत आहे. सध्या बैठकीला सुरुवात झाली असून काही अंतिम निर्णय होतो कि नाही त्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील हेच देऊ शकतील.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now