⁠ 
रविवार, मे 19, 2024

..योग्य वेळी सीडी लावणार ; खडसे यांचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२१ । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्यांची चौकशी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मी सीडी पोलिसांकडे दिली असून योग्य वेळी ती लावणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

भाजप सोडल्यावर एकनाथ खडसे यांनी माझ्यामागे ईडी लावल्यास मी सीडी लावेन असे वक्तव्य केलं होते. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर त्यांच्याविरोधात भोसरी भूखंड प्रकरणी ईडीची कारवाई सुरु झाली आहे. या कारवाईवरुन खडसे सीडी कधी लावणार अशी विचारणा राजकीय वर्तुळात करण्यात येत होती. यावर खडसेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ईडी लावली तर सीडी लावेन असे मी म्हणालो होतो. ते खरेच आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ती सीडी मी पोलिसांकडे दिलेली आहे. पोलिस चौकशी करत आहेत. चौकशीचा अहवाल आला की मी अहवाल जाहीर करणार आहे, असे म्हणत योग्य वेळी मी सीडी लावणार आहे, असा इशारा खडसे यांनी दिला.

मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. पण या काळात माझ्यावर एकही आक्षेप घेण्यात आलेला नाही. राजकारणात कधी कुणी माझ्या विरोधात बोलले नाही. पण जमिनीबाबतचा हा आरोप माझ्यावर हेतुपुरस्सर लावण्यात आलेला आहे. न्यायालयानेही सांगितले आहे की या आरोपांमध्ये तथ्य नाही. कर नाही त्याला डर कशाला, असे म्हणत आपण ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहोत, असे खडसे म्हणाले.

दरम्यान, जे भ्रष्टाचार करतात, त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे मला अपेक्षा आहे की दादांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी, असे खडसे म्हणाले. त्यांनी माझी ईडीची चौकशी लावली हे चंद्रकांतदादांनी मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोला खडसेंनी लगावला.