जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्या कानाखाली लावण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यभरात शिवसेनेकडून नारायण राणेंचा निषेध करण्याची तयारी सुरु असून पुणे, नाशिक आणि महाडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, शिवसेना नेते आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील नारायण राणेंवर टीका केली असून त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे असं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “मला वाटतं नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. एक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री…ज्यांनी ही पदं भोगली आहेत, या पदाची गनिमा त्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा तो संपूर्ण राज्याचा असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे. जर ते नसेल तर त्यांना रुग्णालयात दाखल केलं पाहिजे आणि वेळ आली तर शॉकदेखील दिला पाहिजे,” असा टोला मंत्री पाटील यांनी लगावला आहे.
प्रगतशील राज्याचे मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील होते. शरद पवार देखील होते. त्यांच्या वेळी देखील विरोधी पक्ष होता आणि विरोधी पक्षनेते देखील होते. पण त्यांची एक गरिमा होती. आता हे गरिमा नसलेले भूत इकडे आले आहे. मला तर असे वाटते की यांच्या अंगात चुडेल घुसली की काय? असा प्रकार मला वाटतो. त्यांना भानुमतीच्या एखाद्या भगताकडे न्यायला हवे आणि त्यांच्या अंगात काय घुसले ते पहायला हवे, अशी बोचरी टीका ना.गुलाबराव पाटील यांनी केली आहे.