उज्ज्वला योजनेची गॅस एजन्सी देण्याचे आमिष देत १० लाखांचा गंडा
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । यावल तालुक्यातील दहीवद येथील व्यापाऱ्याला उज्ज्वला योजनेच्या गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून १० लाख ३० हजारांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला होता. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
यावल तालुक्यातील दहीगाव येथील रहिवाशी कालीदास विलास सुर्यवंशी (वय-३३) रा. एसबीआय भरणा केंद्र रा. दहीगाव ता. यावल जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. १८ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर २०२० दरम्यान एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. आशितोष कुमार असे बनावट नाव सांगत त्याने उज्ज्वला गॅस एजन्सीची डिलरशिप देते असे सांगून बनावट कागदपत्रे खरे भासविले. संबंधित व्यक्तीने उज्ज्वला गॅस एजन्सी नावाचे बनावट ऑनलाईन पोर्टल तयार केले होते. त्यांनी वेगवेगळे कारणे सांगून कालीदास सुर्यवंशी यांच्या खात्यातून एकुण १० लाख ३३ हजार रूपये लंपास गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी कालीदास सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या पथकाने संशयित आरोपी सुनिल कुमार सहानी पिता ब्रम्हदेव उर्फ अनिल कुमार (वय-३८) रा. गुनाबस्ती पोस्ट तेजपूर जिल्हा समस्तीपुर (बिहार), कन्हैय्या कुमार सहानी पिता राजेंदर सहानी (वय-४३) रा. बेलीया घाट मेन रोड कलकत्ता यांना अटक केली आहे.