जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२१ । मागील काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने राज्यात जोरदार पुनरागमन केल्याने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज हवामान विभागाकडून राज्यांतील विविध जिल्ह्यांना कुठे यलो अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. आजच्या दिवसासाठी जळगाव जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मागील १५ ते २० दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतात बहरलेली पिके सुकण्याच्या मार्गावर आली होती. तसेच काही भागात पिकांनी माना खाली टाकल्या मुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. जर आठवड्याभरात पाऊस न पडल्यास पिके हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली होत. परंतु जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून पिकांना जीवनदान मिळाले आहे.
दरम्यान, आयएमडीच्या वतीनं आज आणि उद्या महाराष्ट्र, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
या 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट
आजच्या दिवसासाठी यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलडाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.