परिवर्तनतर्फे ” पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवा”चे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२१ । संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन संस्था व भवरलाल अँड कांताई मल्टीपर्पज फाऊंडेशन तर्फे संयुक्त विद्यमाने “पृथ्वीराज चव्हाण परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन” करण्यात आले आहे. रंगकर्मी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाने प्रथमच तीन दिवसीय महोत्सव होत आहे. ते खान्देशातील सुप्रसिद्ध रंगकर्मी व हौशी रंगभुमीवरील काम अतिशय महत्त्वाचे दिग्दर्शक व अभिनेते होते. प्रायोगिक नाटकांच्या निर्मितीसोबतच त्यांनी कलावंताच्या पिढ्या उभ्या केल्या. त्यांनी दिग्दर्शीत केलेल्या नाटकांना अनेक पारितोषिके मिळाली होती. एक पुरोगामी व सशक्त कलाकृतींची निर्मिती करणारा दिग्दर्शक अशी ओळख असलेले पृथ्वीराज चव्हाण खान्देशातील हौशी रंगभूमीवरील थोर कलावंत होते. परिवर्तनशी त्यांचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे होते. उत्तम काही निर्माण होत असेल तर त्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचा त्यांचा स्वभाव होता. अशा थोर रंगकर्मीच्या नावाने कला महोत्सव सुरू करण्याचे परिवर्तनने ठरवले असून तीन दिवसीय “पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवा”चे आयोजन दि. २०, २१ व २२ ऑगस्ट २०२१ असे तीन दिवस करण्यात येत आहे.
कोविड काळातील सर्व नियम पाळून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक रसिकांना प्रवेशिका बंधनकारक असून ज्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. शारीरिक अंतर राखण्यासाठी केवळ 85 रसिकांना सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे . महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २० ऑगस्ट रोजी “अमृता साहिर इमरोज” हे नाटक सादर होणार आहे. यात प्रमुख भूमिका शंभू पाटील व हर्षदा कोल्हटकर यांची असून दिग्दर्शन मंजुषा भिडे यांचे आहे. तर पार्श्वसंगीत राहुल निंबाळकर व तंत्र सहाय्य यांचे आहे.
महोत्सवाच्या दुस-या दिवशी २१ ऑगस्ट शनिवारी, नाटकघर पुणे निर्मित जेष्ठ नाटककार रामू रामनाथन लिखित व अतुल पेठे दिग्दर्शीत “शब्दांची रोजनिशी” हे सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेले नाटक सादर होणार आहे. जगभरातील अनेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर असून भाषिक संस्कृतीच्या स्थितीवर भाष्य करणारे हे अतिशय महत्वाचे नाटक आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे व केतकी थत्ते यांच्या भूमिका आहेत.
महोत्सवाचा समारोप दि. २२ ऑगस्ट रोजी “कबीर” या सांगीतिक कार्यक्रमाने होणार आहे. संत कबीराच्या दोह्याचे सादरीरण सांगितिक पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमाचे दिगदर्शन नारायण बाविस्कर यांनी केले आहे तर संगीत नियोजन मंजुषा भिडे यांचे असणार आहे .
या तीन दिवसीय महोत्सवातील दोन कार्यक्रमांची निर्मिती परिवर्तनची आहे. महोत्सवाच्या आयोजनासाठी बाबत नुकतीच परिवर्तनच्या पदाधिका-यांची बैठक झाली. अध्यक्ष शंभू पाटील, नारायण बाविस्कर व मंजुषा भिडे यांनी याबाबत मार्गदर्शन केले. वसंत गायकवाड, होरिलसिंग राजपूत, सुदिप्ता सरकार, विनोद पाटील, मंगेश कुलकर्णी, डॉ. किशोर पवार, मनोज पाटील, हर्षल पाटील, प्रतिक्षा कल्पराज, राहुल निंबाळकर, सिद्धेष पाटील, अंजली पाटील, हर्षदा पाटील आदी प्रयत्नशील आहेत. या महोत्सवासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनची मोलाची मदत होत आहे .