जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । शिरसोली येथील माहेर असलेल्या २५ वर्षीय विवाहितेचा लग्नात दोन लाख रुपये आणि दागिने दिल्यानंतरही तिचा न्यायालयात नोकरीला असलेल्या पतीसह इतरांनी छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोली येथील पुनम राहुल बारी यांचा १४ मे २०१७ रोजी शिरसोली प्रबो गावात विवाह झाला होता. लग्नात त्यांच्या वडिलांनी स्त्रीधन म्हणून २ लाख रुपये, सहा ग्रॅम सोन्याची अंगठी व इतर संसारोपयोगी वस्तू दिल्या होत्या. पुनम यांचे पती राहुल बारी हे अहमदनगर न्यायालयात नोकरीला होते. काही दिवसांनी त्यांनी जळगाव न्यायालयात बदली करून घेतली. संयुक्त कुटुंब असल्याने सासू मंगलाबाई बारी, जेठ महेंद्र बारी, नंदोई सुनील काशिनाथ बुंदे, नणंद ज्योती बुंदे या कधीही घरी येऊन पुनम यांच्या पतीला काही खोटे सांगत होते. दि. २६ मे २०१९ रोजी त्यांना मुलगी झाली. मुलगी झाल्याने पुनम यांचा त्रास अधिक वाढला. दि.२३ जानेवारी २०२० रोजी गोधडी धुण्याच्या कारणावरून पूनम यांना पतीने मारहाण केली आणि तू आता इथून निघून जा असे सांगत चारित्र्यावर संशय घेतला. महिला दक्षता समितीमध्ये यावर समझोता न झाल्याने पूनम बारी यांनी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार जितेंद्र राठोड करीत आहे.