..अन् त्यांच्या वेदना ऐकून महापौर झाल्या भावूक
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२१ । आपण ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्यांनीच उतारवयात साथ सोडल्यावर काय दुःख होते हे केवळ वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध नागरिकांनाच ठाऊक असते. महापौर जयश्री महाजन यांनी शहरी बेघर निवारा केंद्राला भेट देऊन वृद्धांशी चर्चा केली असता त्यांच्या कौटुंबिक व्यथा ऐकून महापौरांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
शहर मनपाच्या संत गाडगेबाबा निवारा गृहातील एका वृद्ध आजोबांच्या वाढदिवसानिमित्त त्याठिकाणी त्यांची वृक्ष तुला करण्यात आली. प्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी सर्व वृद्ध आजी-बाबांशी चर्चा केली. आजवर केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ म्हणूनच आपल्याच पाल्यांनी घराबाहेर काढले यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. कुटुंबातील आनंदाचे क्षण आणि कुटुंबातील वादविवाद, स्वार्थापोटी लाडक्यांनी घराबाहेर काढले आणि बेघर निवारा केंद्रात पाठविले या सर्व आठवणींना उजाळा देत असलेल्या आजी-आजोबांच्या व्यथा ऐकून महापौर जयश्री महाजन देखील भावूक झाल्या.
१५ ऑगस्टला कार्यक्रमाचे नियोजन
महापौर जयश्री महाजन यांनी शहरी बेघर निवारा केंद्राची आणि त्याठिकाणी असलेल्या बाबींची माहिती घेतली. किचनमध्ये जाऊन पाहणी देखील केली. सर्व वृद्धांसाठी दि.१५ ऑगस्ट रोजी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन महापौरांनी केले आहे. वृद्धांच्या मनोरंजनासाठी आणि धार्मिक आवड जोपासण्यासाठी भजन, किर्तनाचे आयोजन देखील करण्यात येईल असेही आश्वासन महापौरांनी दिले.
शेगाव सहलीचा प्रस्ताव, प्रत्येकीने एक वृद्ध घेतले दत्तक
महापौर जयश्री महाजन यांनी वृद्धांशी चर्चा केली असता सर्वांची शेगाव येथे सहल आयोजित करावी अशी मागणी त्यांनी केली. सध्या कोरोनाच्या निर्बंधांमुळे धार्मिक स्थळे बंद असून निर्बंध हटविल्यानंतर याबाबत नियोजन केले जाईल असे महापौरांनी सांगितले. तसेच सहलीसाठी मनपाकडून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. महापौरांसह कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी एक-एक वृद्ध दत्तक घेण्याचे जाहीर केले. वृद्धांसाठी कपडे आणि इतर अत्यावश्यक वस्तू, पदार्थ त्यांना या उपक्रमाअंतर्गत देण्यात येणार आहे.