जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी महाविद्यालयाचे मस्टर घेऊन त्यावर चार वर्षापासूनच्या दैनंदिन हजेरीच्या स्वाक्षऱ्या करून शिक्षक भरती झाली असल्याचे दर्शविण्याचा प्रकार स्व.नरेंद्र अण्णा गटाने उघड केला होता. याप्रकरणी शनिवारी जिल्हापेठ पोलिसात निलेश भोईटे यांच्यासह प्राचार्य आणि इतर आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऍड.विजय पाटील यांनी दिलेली फिर्याद अशी की, मी जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगांव या संस्थेचा संचालक असून सद्या प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.
आज दिनांक १९/०७/२०२१ सोमवार रोजी सायंकाळी ६.०० वाजेच्या दरम्यान मी संस्थेच्या कार्यालयात बसलेलो असतांना मला कळाले की, महाविद्यालयाचे उपप्राचार्य (ज्युनिअर कॉलेज) श्री. ए. बी. वाघ यांचे महाविद्यालयात असलेल्या कॅबीन मध्ये कार्यालयीन वेळ संपल्या नंतर पाच महिला व दोन पुरुष असे एकूण सात लोक अनोळखी व संदिग्ध तसेच उपप्राचार्य ए. बि. वाघ, प्रकाश आनंदा पाटील शिक्षक अमळगांव विद्यालय, ता. अमळनेर, शिवराज बा. माणके ही सर्व मंडळी उप प्राचार्यांची कॅबीन बंद करून खोटे व बनावट मस्टर तयार करीत आहेत असे समजले. त्यावेळी मी उपप्राचार्य श्री. ए. बि. वाघ यांना त्यांचे मोबाईल नंबर ९४२२५६१८५१ या नंबर वर माझे मोबाईल नंबर वरुन फोन लावला परंतु दोन वेळा फोन लावून देखील त्यांनी माझा फोन घेतला नाही.
त्यानंतर मी स्वतः व माझे सोबत असलेले दोन व्यक्ती असे कॉलेज मधील उप प्राचार्य यांचे कॅबीनकडे गेलो. त्याठिकाणी वर नमुद केलेले सात अनोळखी व्यक्ती व चार संस्थेचे कर्मचारी असे सर्व लोक हजर होते व तेथे जुने मागील चार-पाच वर्षाचे कॅलेंडर (दिनदर्शिका) घेवून एक खोटे व बनावट मस्टर तयार करुन त्यावर जून २०१७ ते २३ जुलै २०२१ अशा कालावधीतील मागील चार वर्षांच्या खोट्या सह्या मस्टर वर करीत होते. त्याचवेळी आम्ही दरवाज्या बाहेर थांबून असतांना त्यांचेमध्ये चर्चा चालु होती की, निलेश भोईटे व प्राचार्य एल.पी. देशमुख यांचे सांगणे प्रमाणे आम्ही तुमचे चार वर्षाचे मस्टर तुमच्या सह्यांचे तयार करुन देत आहोत. शासनाकडून मान्यता घेवून पगार काढून देणे हा व्यवहार वेगळा राहील असा प्राचार्य देशमुख यांचा फोन मला आताच आला होता.
असे उप प्राचार्य ए. बी. वाघ, प्रकाश आनंदा पाटील व शिवराज मानके तेथे उपस्थित अनोळखी इसमांना सांगत असतांना त्यांना आमची चाहूल लागली व त्यांनी बोलणे थांबवले. त्यावेळी आम्ही दरवाजा ढकलून आत गेलो असता त्यांची आम्हांस पाहून भांबेरी उडाली. त्यावेळी मी अनोळखी सात व्यक्तींपैकी एक जण सह्या करीत असलेले मस्टर पाहिले असता, मी त्यांना सांगितले की, तुम्ही चार वर्षांचे बनावट मस्टर तयार करुन ह्या सात व्यक्ती संस्थेच्या कर्मचारी नसतांना तुम्ही त्यांच्या चार वर्षांच्या सहा एकाच दिवशी करुन संस्थेची व शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करीत आहात. असे सांगताच तेथे हजर असलेले सात अनोळखी इसम व वर उल्लेख केलेले चार कर्मचारी कॅबीन मधून निघून पळून जावु लागले. ते तेथुन पळून जात असतांनाचे फोटो आम्ही मोबाईल मध्ये घेतले तसेच ते बनावट बनवत असलेले मस्टर मी फिर्याद देण्यासाठी सदर बनावट मस्टर तेथुन घेतले व सदर प्रकरणी फिर्याद देण्यासाठी आता मी पोलीस स्टेशनला घेवुन आलेलो आहे.
सदर मस्टरवर एक ते सात क्रमांक लिहीलेले असून पाचव्या क्रमांकावर सौ. ए. एस. भोळे, तर श्रीमती एम. ए. धामणे व श्री. एन. एस. गावंडे यांचे सहा व सात क्रमांकावर नावे लिहलेले आहेत. पैकी क्रमांक सहा च्या दिनांक १५ जून २०१७ पासून २३ जुलै २०२१ पर्यंत सहा केलेल्या आहेत व क्रमांक सात यांच्या दिनांक १५ जून २०१७ पासून २४ आक्टोंबर २०१८ पर्यंत सह्या केलेल्या आहेत. आम्ही अचानक आत गेल्यामुळे श्री. गावंडे यांची दिनांक २४ आक्टोबर २०१८ ची सही अर्धवट राहुन बाकी पुढील सहा करावयाच्या राहुन गेलेल्या आहेत.
नमुद पुढील (१) निलेश रणजित भोईटे, (२) लक्ष्मण प्रताप देशमुख, प्राचार्य यांच्या सांगण्यावरुन (३) ए.बि.वाघ, उपप्राचार्य, (४) शिवराज वा. माणके, (५) प्रकाश आनंदा पाटील, (शिक्षक अमळगांव, ता. अमळनेर), कर्मचारी नसलेले बनावट सह्या करणारे (६) श्रीमती. एम. ए. धामणे, (७) एन. एस. गावंडे व तश्याच बनावट सह्या करण्याचे उद्देशाने तेथे हजर असलेले (८) सौ.ए.एस. भोळे व इतर चार अनोळखी व्यक्ती अशांनी एकत्रित येऊन वरीलफिर्यादीत नमुद सर्व आरोपींनी कट करून संस्थेची व शासनाचे कोणतेही कर्मचारी नसतांना सात जणांच्या एकाच वेळी चार वर्षांच्या सह्या करुन गेल्या चार वर्षांपासून काम करीत असल्याचे भासवून शासनाची व संस्थेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेण्यासाठी वरील फिर्यादीतील नमुद सर्व आरोपींनी कट रचला होता.
तरी वर नमुद फिर्यादीतील सर्व व्यक्तींविरुध्द खोटे कागदपत्र तयार करुन फिर्यादीत नमूद सर्व आरोपी यांनी कट करून संस्थेची व शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्याचा गुन्हा तसेच वर नमुद आरोपी क्रमांक दोन, तीन, चार व पाच हे संस्थेचा व शासनाचा पगार घेवून शासनाची फसवणूक करण्याचा वरील फिर्यादीतील नमुद सर्व आरोपी विरुध्द कट रचण्याचा गुन्हा दाखल करावा अशी फिर्याद ऍड.पाटील यांनी दिली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे करीत आहे.