जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी गेल्या काही महिन्यात पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. शहरात एकही नगरसेवक निवडून न आणलेल्या राष्ट्रवादीची पाळेमुळे भक्कम करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठी करीत असले तरी स्थानिकांची मने काही जुळत नाही. पक्षबांधणीचा आढावा घेण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत ४ ‘अ’ फार महत्त्वाचे ठरले. पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक हे निर्णायक होते तर विद्यमान महानगराध्यक्ष अभिषेक पाटील व इच्छुक अशोक लाडवंजारी यांच्यावरूनच सर्व चर्चा रंगली आणि पदाधिकारी सडेतोड बोलले.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार हे जवळपास निश्चितच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील व महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. दोघांच्या नेतृत्वाखाली पक्षाने प्रगती केली असली तरी गटबाजी थोपविण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहे. जिल्ह्यात दहा चेहरे असले तरी शहरात मात्र अभिषेक पाटील शिवाय दुसरे नाव समोर येत नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीमुळे पक्षाची प्रतिमा शहरातच सर्वाधिक मलीन होत आहे. भाजपचे संकट मोचक आ.गिरीश महाजन यांच्या करिष्मापुढे राष्ट्रवादीला मनपात एक नगरसेवक निवडून आणता आला नाही, इतकंच काय तर फोडाफोडीच्या राजकारणात देखील एकही नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागला नाही. शहरात गटबाजी आणि एकमेकांचे पाय खेचण्यात शून्य होत चाललेली राष्ट्रवादी पुन्हा आमदारकीचे स्वप्न पाहत आहे.
पक्षातील सर्व संघटनात्मक आणि सध्यास्थितीचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक अविनाश आदिक ३ दिवस जिल्ह्यात येऊन गेले. चाळीसगाव ते जळगाव दौरा करीत अतिशय अचूक आणि सूक्ष्म निरीक्षण त्यांनी नोंदविले. पक्षातील किरकोळ कुरबुरी तर माध्यमातून आणि स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींपर्यंत नेहमीच पोहचवीत असतात. उरलीसुरली गटबाजी जाहिरात आणि फलकबाजीतील फोटोवरून समोरच आली.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी गुरुवारी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे बैठक बोलवण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्रकृती अस्वस्थतेमुळे बैठकीला अनुपस्थित असले तरी अजित पवार यांनी बैठक घेतली. पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांनी तीन दिवसीय दौऱ्याचा संपूर्ण आढावा मांडला. त्यात जळगाव शहरासह इतर तालुक्यात प्रकर्षाने जाणवलेल्या सर्व बाबी त्यांनी नमूद केल्या. जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी पक्षातील बदलांबाबत मुद्दा मांडला असता माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी देखील त्यास समर्थन दर्शविले. विद्यमान महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या विरोधात इतर पदाधिकारी अशी चर्चाच बैठकीत सुरू झाली होती. कुणी पक्षासाठी किती योगदान दिले यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला. अजित पवारांनी सर्वांना शांत करीत प्रत्येकाची बाजू समजून घेतली ऍड.रवींद्र भैय्या पाटील यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाला समर्थन दर्शविले. जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून विविध समित्यांवर शिवसेनेला संधी दिली जात असून राष्ट्रवादीला स्थान मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. विविध समित्यांवर राष्ट्रवादीला देखील संधी मिळावी अशी एकमुखी मागणी बैठकीत झाली तर बैठकीदरम्यान राष्ट्रवादीचे सदस्य असलेल्या अशोक लाडवंजारी यांना महानगराध्यक्ष करण्याची मागणी देखील मांडण्यात आली. पक्षातील एका पदाधिकाऱ्याने इतरांविरुद्ध केलेले आक्षेपार्ह वक्तव्य, सोशल मिडियात पाठविलेल्या मेसेजचा पुरावाच त्याठिकाणी मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यावर जाम भडकले. पक्षात जे काम करत नसतील त्यांना पर्याय शोधा किंवा जे जबाबदारीला न्याय देऊ शकत नाहीत त्यांच्यावर इतर जबाबदाऱ्या सोपवा असा सल्लाही अजित पवार यांनी निरीक्षकांना दिला.
एकंदरीत बैठकीत चर्चा वादळी झाली पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नसल्याने तूर्तास ठोस निर्णय होऊ शकले नाही. बैठकीचा सार काही निघाला नसला तरी पक्षाचे कोणतेही पदाधिकारी नसलेल्या अशोक लाडवंजारी यांची बैठकीला उपस्थित म्हणजे ‘कुछ तो होनेवाला है’ चा मामला आहे.
आगामी विधानसभा, लोकसभा, जळगाव मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसला आतापासूनच आपले पक्ष संघटन मजबूत करणे आवश्यक असून पक्षातील गटबाजी दूर करून सर्वांना सांभाळून घेत पुढील वाटचाल करण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर आहे. बैठकीचे फलीत काय हे येणाऱ्या काळात समोर येईल तूर्तास होणाऱ्या चर्चांवर विश्वास ठेवण्यापलीकडे कार्यकर्त्यांकडे दुसरा मार्ग नाही.