जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । आठवडाभर धुमशान घातल्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा धुवाँधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुढील तीन तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि जालन्यात पुढील तीन तासांत मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने या जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. सध्या नागपुरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. नागपूरसह परिसरात ढगाळ हवामान आणि रिमझीम पाऊस होत आहे. रात्रीपासूनच पडत असलेला पाऊस येत्या चार दिवसात जोर पकडण्याचा अंदाज आहे.
सोमवारपर्यंत पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून 2 ऑगस्टपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाच्या अधिक माहितीसाठी आयएमडीच्या मुंबई आणि नागपूर वेधशाळेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.