राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या हवेत उड्या, निरीक्षक म्हणतात तूर्तास बदल नाही
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । जिल्हा राष्ट्रवादीत फेरबदल होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. मुंबई येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिल्याची माहिती इच्छुकांकडून देण्यात येत आहे.
दरम्यान, आज झालेल्या बैठकीत कार्यकारिणीतील पदाधिकारी बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नसून विविध समित्यांवर राष्ट्रवादीच्या चेहऱ्यांना संधी मिळावी अशी एकमुखी मागणी सर्वांनी केल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस तथा जिल्ह्याचे निरीक्षक अविनाश आदिक यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली.
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष आणि महानगराध्यक्ष बदलण्यात येणार असल्याच्या चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
जळगाव अजून एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक अशोक लाडवंजारी यांची महानगराध्यक्ष पदासाठी तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चा होती. मुंबईतील बैठकीत जिल्हा कार्यकारिणीत बदल करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिल्याची चर्चा होत असली तरी या गोष्टी चर्चा म्हणजे सध्या हवेत तीर आहेत.
प्रदेश सरचिटणीस तथा पक्षाचे जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांच्याशी जळगाव लावेने संपर्क साधला असता, आज झालेल्या बैठकीत काही दिवसांपूर्वी मी घेतलेल्या जळगाव दौऱ्याची माहिती सादर करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील विविध समित्यांवर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी एकमुखी मागणी सर्वांनी केली. यासंदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे अजित पवार यांनी सांगितले.
तसेच स्थानिक कार्यकारणी बदलाबाबत काही चर्चा झाली नसून पक्षातील जे पदे रिक्त आहेत त्या ठिकाणी नियुक्त्या करण्याचे आणि पक्षातील जे स्थानिक पदाधिकारी काम करीत नाही किंवा ज्यांचे काम समाधानकारक नाही त्याबाबत आढावा घेऊन त्यांना इतर जबाबदाऱ्या सोपविण्याचा सूचना अजित पवार यांनी दिल्या असल्याची माहिती अविनाश आदिक यांनी दिली.