⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

चाळीसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीकलाशांचे राष्ट्रीय प्रेरणा स्मारक व्हावे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । चाळीसगाव शहरातील आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा नूतनीकरण करताना त्यांचे 2 अस्थीकलश मिळून आले होते. पुढील पिढीला प्रेरणा मिळूत्यांना त्या अस्थीकलशांचे दर्शन मिळावे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील अस्थीकलशांचे चाळीसगाव येथे भव्य प्रेरणा स्मारक व्हावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, बहुजन क्रांती मोर्चा, अखिल भारतीय सफाई महासंघाच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन दि 27 जुलै 2021 रोजी तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आंबेडकर चौकात काही दिवसांपूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 2 अस्थीकलशा पुतळा नूतनीकरण करताना उत्खननात मिळून आले होते. या अस्थीकलशांचा लिखित पुरावा देखील आहे 15 डिसेंबर 1956 रोजी पुंडलिक वाघ, बी सी कांबळे, आर डी भंडारे, दिवाण चव्हाण, शामाजी जाधव आदी समाज बांधवांनी हे अस्थीकलश रेल्वेने आणून भव्य मिरवणूक काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात शोकसभा झाली होती.

त्यानंतर विधीवत कार्यक्रम आटोपून याठिकाणी बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे असा ठराव समिती अध्यक्ष राघो जाधव, सेक्रेटरी ओंकार जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. त्यानंतर 14 एप्रिल 1961 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला व त्याखाली हे अस्थीकलश ठेवण्यात आले होते. आता नव्याने या पुतळ्याचे नूतनीकरण करत असताना उत्खननात 2 अस्थीकलश मिळून आले आहेत. महामानावाच्या अस्थीकलशाचे पावित्र्य लक्षात घेऊन 14 एप्रिल व 6 डिसेंबर रोजी समाज बांधवांना अस्थीकलशांचे प्रेरणादायी दर्शन व्हावे व पुढील पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून शासनाने याठिकाणी भव्य प्रेरणा स्मारकाची निर्मिती करावी अशी मागणी समस्त आंबेडकर प्रेमींच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संभा आप्पा जाधव, भाईदास गोलाइत, बहुजन क्रांती मोर्चा चे मुकेश नेटकर, अखिल भारतीय सफाई महासंघाचे देविदास जाधव, विजय जाधव, गणेश देवरे आदींच्या सह्या आहेत.