जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । राज्यातील पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागातील शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन ते आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करतील.
जेणेकरुन ते कृषि उत्पादकतेत भर घालण्यासाठी योगदान देतील तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यातंर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
या पिक स्पर्धेत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल ही 11 पिके समाविष्ठ आहेत. पिक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख खरीप हंगामातील मुग व उडीद पिकासाठी 31 जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकांसाठी अंतिम दिनांक 31 ऑगस्ट, 2021 अशी आहे.
पिक स्पर्धेतील पिकाची निवड करताना पिकनिहाय तालुक्यातील संबधित पिकाखालील क्षेत्र किमान 1 हजार हेक्टर असावे. किमान स्पर्धेक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असावी. पीकस्पर्धेत सहभागी लाभार्थीचे किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस5 हजार रुपये दुसरे बक्षिस 3 हजार रुपये, तिसरे बक्षिस 2 हजार रुपये, जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार रुपये, दुसरे बक्षिस 7 हजार रुपये, तिसरे बक्षिस 5 हजार रुपये, विभागीय पातळीसाठी पहिले बक्षिस 25 हजार रुपये, दुसरे बक्षिस 20 हजार रुपये, तिसरे बक्षिस 15 हजार रुपये, तर राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 40 हजार रुपये, तिसरे बक्षिस 30 हजार रुपये आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिक स्पर्धेत सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी व कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.