पावसाने भिंत कोसळली, दबल्याने चिमुकल्याचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२१ । यावल तालुक्यातील मालोद गावात एका घराची मातीची भिंत कोसळून ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. आबीद तडवी असे बालकाचे नाव असून गावातील नागरीकांनी कोसळलेल्या भिंतीच्या ढीगाऱ्यातून चिमुकल्याला बाहेर काढले मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
जिल्ह्यात गेल्या २-३ दिवसांपासून अनेक भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. यावल तालुक्यातील मालोद या गावात इमाम दगडू तडवी हे परिवारासह राहतात. रविवारी सकाळी त्यांचा मुलगा आबीद हा घरात खेळत होता. मातीचे घर असल्याने पावसाचे पाण्याने भिंत ओली होवून पाणी त्यात मुरले होते. यामुळे कोणाला काही समजण्याच्या आधीच अचानक भिंत कोसळली. भिंतीखाली चिमुकला दबला गेला. श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झालेला होता. मालोद येथील तलाठी तेमरसिंग बारेला यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन पंचनामा केला. मृत बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी केले. वडील इमाम तडवी यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.