जिल्हा रुग्णालयात आजपासून ‘नॉन कोविड’ची सुविधा
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २२ जुलै रोजी पासून कोरोनाविरहित (नॉन कोविड) सेवा सुरु होत आहे. गेल्या ४ महिन्यांपासून हे रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांसाठी खुले होते. सकाळी ८. ३० ते १ वाजेपर्यंत ओपीडी रुग्णालयाच्या आवारात सुरु राहील.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मुख्य गेट क्रमांक १ मधून येत आवारात असलेल्या केसपेपर विभागातून केसपेपर घेऊन ओपीडीमध्ये जाऊन वैद्यकीय सेवा घेता येईल. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी नेहमीप्रमाणे अपघात विभागात सेवा सुरु राहणार आहे. बुधवारी २१ जुलै रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सकाळी ओपीडी विभागात जाऊन पाहणी करीत अधिकारी, कर्मचारी यांना विविध सूचना केल्या. यावेळी उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. विलास मालकर, डॉ. भाऊराव नाखले, डॉ. बाळासाहेब सुरोशे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी गंभीर आजारावर इलाज घेण्यासाठी येताना सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड आणावे. नागरिकांना मदतीसाठी जनसंपर्क कक्ष सुरु राहणार आहे. वाहन पार्किंगकरीता गेट क्र. २ चा वापर करावा व रुग्णालय प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.