भोंगळ कारभार : लसीकरण न करताच मिळाले लसीकरण प्रमाणपत्र
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२१ । शहरातील रहिवासी असलेल्या एका दाम्पत्याने भुसावळ रेल्वे हॉस्पिटलमध्ये कोवॅक्सिनच्या पहिल्या डोससाठी नोंदणी केली असता भोंगळ कारभार उघड झाला आहे. ढोले दांपत्य लसीकरणाला गेले नसतानाही त्यांना लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याचा संदेश आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कर्मचारी असलेले राहुल ढोले व त्यांच्या पत्नी उज्ज्वला ढोले यांनी कोवॅक्सिनच्या पहिल्या डोससाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये शनिवारी त्यांना पहिला डोस दिला जाणार होता परंतु कौटुंबिक अडचणीमुळे ते लस घेण्यासाठी जाऊ शकले नाही.
दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर लसीचा पहिला डोस घेतल्याचा संदेश प्राप्त झाला. संदेश पाहताच त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक केले असता लसीकरणाचे प्रॉव्हिजनल सर्टिफिकेट देखील त्यांना प्राप्त झाले आहे.
ढोले दाम्पत्याने संबंधित रेल्वे विभागीय कार्यालयात संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. लसीकरणाच्या गोंधळाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. बनावट लसीकरण करणाऱ्या संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार हे पाहणे गरजेचे आहे.