
जळगाव लाईव्ह न्यूज । क्राइम सीरियलच्या कथानकाला लाजवेल अशी धक्कादायक घटना गुजरातमधील सुरत जिल्ह्यात घडली आहे. कामाच्या शोधासाठी कारने निघालेल्या जळगावातील एका कुटुंबाची कार अडवून चौघांनी त्यांना जबरदस्तीने खाली उतरवले आणि सहा जणांना खोल कालव्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असून, दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. एका १३ वर्षीय मुलाने पाईपचा आधार घेत आपला जीव वाचवला.
ही धक्कादायक घटना सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळील कालव्याच्या परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव परिसरातील हे कुटुंब एरंडोल येथील एका कारखान्यात मजुरीचे काम करत होते. कामाच्या शोधासाठी कुटुंबातील सदस्य २१ नोव्हेंबर रोजी कारने सुरतकडे निघाले होते.
दरम्यान, त्यांची कार बारडोलीतील उवा कालव्याजवळ आली असता दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना कारमधून जबरदस्तीने खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांना एक-एक करून खोल कालव्यात फेकण्यात आल्याचा आरोप आहे.
कालव्यात फेकल्यानंतर १३ वर्षीय मुलाच्या हाताला पाण्यात टाकलेला एक पाईप लागला. त्याने त्या पाईपचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर तो कसाबसा कालव्याबाहेर आला आणि जवळच्या एका हॉटेलमध्ये पोहोचला. तेथे त्याने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी कालव्यात शोधमोहीम सुरू केली. शोधादरम्यान महुआ तालुक्यातील डुंगरीजवळील काकरापार कालव्यातून एक पुरुष, एक महिला आणि एका तरुणीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. कुटुंबीयांनी या मृतदेहांची ओळख पटवली. मृतांमध्ये नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील आणि कविता पाटील यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
कविता पाटील यांच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर त्या नितीन पाटील यांच्यासोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कुटुंबातील दोन मुले अद्याप बेपत्ता असून, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून कालव्यात त्यांचा शोध सुरू आहे.
या हल्ल्यामागे नेमके कारण काय, आरोपींनी कुटुंबाला कालव्यात का फेकले आणि हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला की अन्य कोणत्या कारणातून, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.या प्रकरणी खंडिया, आभा, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असून, या संपूर्ण घटनेमागील कारण उघड करण्यासाठी तपासाला वेग देण्यात आला आहे.





