जळगाव जिल्हा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर-मुंबईदरम्यान धावणार ११ विशेष गाड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर जाणाऱ्या अनुयायांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले आहे. नागपूर-मुंबई, मुंबई-नागपूर तसेच अमरावती-मुंबईदरम्यान एकूण ११ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांना भुसावळ, जळगाव, मलकापूर, नांदुरा, अकोला यांसह मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या विशेष गाड्या ४ आणि ५ डिसेंबरला धावणार आहेत. ४ डिसेंबरला गाडी क्रमांक ०१२६० नागपूरहून सायंकाळी ६.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता मुंबईत पोहोचेल. त्याच दिवशी गाडी क्रमांक ०१२६२ रात्री ११.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ४.१५ वाजता मुंबईला पोहोचणार आहे.

५ डिसेंबरला गाडी क्रमांक ०१२६४ सकाळी ७.४० वाजता नागपूरहून सुटून रात्री ११.५५ वाजता मुंबईत पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१२६६ सायंकाळी ६.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता मुंबईत दाखल होईल.

मुंबईहून नागपूरकडे परतण्यासाठी ६ ते ८ डिसेंबरदरम्यान पाच विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. ६ डिसेंबरला गाडी क्रमांक ०१२४९ रात्री ८.२५ वाजता मुंबईहून रवाना होईल. ७ डिसेंबरला गाडी क्रमांक ०१२५१ सकाळी १०.३० वाजता, ०१२५५ दुपारी १२.३५ वाजता आणि ०१२५७ मध्यरात्री १२.२५ वाजता मुंबईहून सुटणार आहे. तसेच गाडी क्रमांक ०१२५३ दादरहून ७ डिसेंबरला मध्यरात्री १२.४० वाजता रवाना होईल.

दरम्यान, अमरावती-मुंबई विशेष गाडी क्रमांक ०१२१८ ही ५ डिसेंबरला अमरावतीहून सायंकाळी ५.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२५ वाजता मुंबईला पोहोचणार आहे. या गाडीची परतीची सेवा ०५२१७ ही ७ डिसेंबरला मुंबईहून मध्यरात्री १२.४० वाजता सुटून दुपारी १२.५० वाजता अमरावतीला पोहोचेल.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या अनुयायांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने या विशेष गाड्यांचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. भुसावळ, जळगाव, मलकापूर, नांदुरा आणि अकोला यांसह मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबे असल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनुयायांना मुंबई गाठणे अधिक सोयीचे होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button