जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय निवड चाचणीसाठी निवड

चंदन अडे व विनायक वसावे यांची निवड; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत आयोजित क्रीडा महोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय, जळगाव येथे १८ व १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या विभागीय क्रीडा निवड चाचणीत डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची बारामती येथे होणार्‍या आंतरविभागीय क्रीडा निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.या निवड चाचणीत कबड्डी या क्रीडा प्रकारात चंदन अडे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपली निवड निश्चित केली. तर खो-खो या क्रीडा प्रकारात विनायक वसावे याने चमकदार कामगिरी करत आंतरविभागीय निवड चाचणीसाठी पात्रता मिळवली. दोन्ही खेळाडूंच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक डॉ. प्रतिक पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य विकसित करण्यास आणि स्पर्धेत आत्मविश्वासाने सहभागी होण्यास मदत झाली.या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले.

प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनीही त्यांचे कौतुक करून बारामती येथे होणार्‍या आगामी आंतरविभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, आगामी स्पर्धांमध्येही खेळाडू उत्तम कामगिरी करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button