जळगाव जिल्हा

जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने ; पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील उद्योग-व्यापार क्षेत्रासाठी दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी आली आहे. जिल्ह्यातील उद्योगांना विदर्भ–मराठवाड्याच्या धर्तीवर विशेष औद्योगिक प्रोत्साहने मिळावीत, यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर शासन निर्णयाच्या रूपाने यश मिळाले आहे. राज्य शासनाच्या उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाने आज, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नवीन उद्योगांच्या उभारणीसह विद्यमान उद्योगांच्या विस्ताराला मोठी चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिळालेली ही भेट जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जळगाव जिल्ह्याला औद्योगिक प्रोत्साहनांच्या बाबतीत अधिक लाभदायक स्थान मिळावे, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न केले. या मागणीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांचेही पाठबळ मिळाले. जिल्ह्यातील उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मिती या समान उद्दिष्टासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे भूमिका मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची सकारात्मक भूमिका महत्त्वपूर्ण

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून २५ ऑगस्ट २०२६ रोजी तसेच वेळोवेळी झालेल्या उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. जिल्ह्यातील उद्योगांना अधिक प्रोत्साहने मिळावीत, यासाठी संबंधित प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतरही या विषयाचा पाठपुरावा सुरू होता. अखेर शासनाने अधिकृत निर्णय जारी केल्याने जिल्ह्यातील उद्योजकांची महत्त्वाची मागणी मार्गी लागली आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पात्र उद्योगांना लाभ

शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण-२०२५ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात नव्याने स्थापन होणाऱ्या तसेच विस्तारीकरण अथवा विविधीकरण करणाऱ्या पात्र औद्योगिक घटकांना विदर्भ–मराठवाडा क्षेत्राप्रमाणे प्रोत्साहने अनुज्ञेय करण्यात आली आहेत. यामध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम तसेच विविध श्रेणींतील मोठ्या उद्योगांचा समावेश होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे, या निर्णयाचा लाभ केवळ जळगाव एमआयडीसीपुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पात्र औद्योगिक प्रकल्पांसाठी लागू होणार आहे. संबंधित उद्योगांना धोरणातील निकष, अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रोत्साहनांचा लाभ घेता येणार आहे.

नवीन औद्योगिक धोरणानुसार पात्र सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या ८० टक्क्यांपर्यंत एकूण प्रोत्साहनांची कमाल मर्यादा आणि दहा वर्षांचा प्रोत्साहन कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तसेच पात्रतेनुसार औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, व्याज अनुदान, मुद्रांक शुल्क सवलत व वीजविषयक प्रोत्साहनांच्या तरतुदीही उपलब्ध आहेत. यामुळे जिल्ह्यात नवीन गुंतवणूक आकर्षित होण्यास, कृषीप्रक्रिया व उत्पादन उद्योगांचा विस्तार होण्यास आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

जळगावच्या उद्योगांना नवी उभारी; जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम, हेच आमचे ध्येय !”

“जळगाव जिल्ह्यातील उद्योगांना न्याय मिळावा, नवीन उद्योग यावेत आणि आपल्या तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागू नये, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो. आज त्या प्रयत्नांना शासन निर्णयाच्या रूपाने यश मिळाले, याचा मनस्वी आनंद आहे. ही केवळ उद्योजकांसाठी दिवाळीची भेट नाही, तर जिल्ह्याच्या औद्योगिक भविष्याला नवी दिशा देणारा निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मंत्री, खासदार आणि आमदारांच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले. जळगावच्या मातीत उद्योग वाढावेत, व्यापार फुलावा आणि प्रत्येक कष्टकरी तरुणाच्या हाताला काम मिळावे, हीच आमची खरी अपेक्षा आहे. या निर्णयाचा लाभ घेऊन उद्योजकांनी जिल्ह्याच्या प्रगतीला नवी गती द्यावी.”
— ना. गुलाबराव पाटील पालकमंत्री

पाठपुराव्यापासून शासन निर्णयापर्यंतचा महत्त्वपूर्ण टप्पा

जळगाव जिल्ह्यात उद्योगांसाठी आवश्यक जागा, वीज, पाणी, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विविध बैठकांमधून सातत्याने पाठपुरावा केला आहे. कुसुंबा–चिंचोली औद्योगिक क्षेत्राचा विस्तार तसेच जिल्ह्यातील इतर औद्योगिक वसाहतींच्या विकासाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता विशेष औद्योगिक प्रोत्साहनांबाबत शासन निर्णय जारी झाल्याने जिल्ह्यातील गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाच्या प्रयत्नांना महत्त्वाचे बळ मिळाले आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांसाठी नव्या संधींची दारे खुली झाली असून, औद्योगिक गुंतवणुकीतून व्यापार, वाहतूक, सेवा क्षेत्र आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या एकजुटीला मिळालेले हे यश उद्योग-व्यापार क्षेत्रासाठी दिवाळीची मोठी भेट ठरले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button