गुन्हेजळगाव शहर

जळगावात घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल फिर्यादीला परत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । घरफोडीच्या गुन्ह्यात हस्तगत केलेले तब्बल ३२ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम एमआयडीसी पोलिसांनी मूळ फिर्यादीला परत केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे फिर्यादी संगिता राजू घुगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नेमकी घटना काय?

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाजन नगर, रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या संगिता राजू घुगे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींना अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आणि त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.

यानंतर जप्त केलेला मुद्देमाल परत मिळावा, यासाठी फिर्यादी संगिता घुगे यांनी जळगाव न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुद्देमाल परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात पंचांसमक्ष अधिकृत पंचनामा करून एकूण ३२ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मूळ फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ फिर्यादी किंवा मालकांना तातडीने परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी ही कार्यवाही केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button