
जळगाव लाईव्ह न्यूज । ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी केल्याच्या तक्रारीची जळगाव जिल्हा पोलिसांकडून सविस्तर चौकशी करण्यात आली. या प्रकरणातील उपलब्ध माहिती, विमानतळ प्रशासनाकडून मिळालेली अधिकृत माहिती आणि प्राथमिक चौकशीतून संबंधित दृश्य हे ड्रोनचे नसून प्रशिक्षण विमानाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
एकनाथ खडसे यांनी २ ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अर्ज सादर केला होता. मुक्ताईनगर येथील त्यांच्या फार्महाऊसवर २८ जून २०२६ रोजी रात्री ७.५० ते ८.१५ वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीकडून ड्रोनद्वारे रेकी किंवा चित्रिकरण करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.
विमानतळ प्रशासनाकडून माहिती मागवली
तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुक्ताईनगर पोलिसांनी चौकशी सुरू केली. तक्रारीतील दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, जळगाव विमानतळ प्रशासन तसेच संबंधित विमान प्रशिक्षण संस्थांशी पत्रव्यवहार करण्यात आला. २८ जून रोजी तक्रारीत नमूद केलेल्या वेळेच्या सुमारास प्रशिक्षण विमान किंवा अन्य विमानाने उड्डाण केले होते का, याची माहिती मागविण्यात आली.
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जळगाव विमानतळावर दोन फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून बाळापूर व अमरावती परिसरावरून नियमित प्रशिक्षण उड्डाणे केली जातात. उपलब्ध अभिलेखांनुसार, २८ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.४० वाजता जळगाव विमानतळावरून बाळापूर परिसराच्या पुढे अमरावतीच्या दिशेने जाण्यासाठी प्रशिक्षण विमानाने उड्डाण केले होते.
व्हिडिओ आणि विमान वाहतुकीच्या नोंदींची पडताळणी
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान तक्रारदारांनी उपलब्ध करून दिलेला संबंधित व्हिडिओ तपासण्यात आला. तसेच पोलिसांनी तक्रारीत नमूद केलेल्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आणि ‘प्लेन फाइंडर’ या अॅपवरील विमान वाहतुकीच्या नोंदींचीही पडताळणी केली.
या पडताळणीत संबंधित वेळेच्या सुमारास परिसरातून विमान जात असल्याची माहिती उपलब्ध झाली. विमानतळ प्रशासनाकडून मिळालेली अधिकृत माहिती, संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे, घटनास्थळाची पाहणी आणि विमान वाहतुकीच्या नोंदी यांचा एकत्रित विचार करण्यात आला.प्रेस नोटनुसार, उपलब्ध माहिती आणि प्राथमिक चौकशीत तक्रारदारांनी ड्रोनद्वारे रेकी केल्याचा व्यक्त केलेला संशय पुष्ट होत नसून, संबंधित दृश्य हे प्रशिक्षण विमानाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन उपलब्ध पुरावे, अधिकृत माहिती आणि वस्तुस्थितीच्या आधारे चौकशी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.





