
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले सुमारे ६५ कोटी ७० लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जळगाव पोलिसांकडून नष्ट करण्यात आले. यामध्ये ४६.१५४ ग्रॅम वजनाच्या अॅम्फेटामाइन आणि मेथाक्वालोन या अंमली पदार्थांचा समावेश होता. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे आज ९ ऑक्टोबर रोजी ही प्रक्रिया पार पडली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमालाचा नियमानुसार नाश करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, केंद्र सरकारचे नियम तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि अंमली पदार्थविरोधी कृती दलाच्या सूचनांनुसार जप्त अंमली पदार्थांचा नाश करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जप्त मुद्देमालाचा आढावा घेऊन नाश करण्याची कार्यवाही केली.
रांजणगाव एमआयडीसीमध्ये अंमली पदार्थांचा नाश
९ ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या स्ट्राँग रूममधून पंचांसमक्ष आणि वजन-मापे निरीक्षक गौतम उत्तम बावस्कर यांच्या उपस्थितीत जप्त अंमली पदार्थ सीलबंद अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात हा मुद्देमाल पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील M/s Maharashtra Enviro Power Ltd. येथे नेण्यात आला.
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. समितीने पडताळणी करून मुद्देमाल नष्ट करण्यास मान्यता दिल्यानंतर नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या नाश प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरणही करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय गायाकवाड, पोलीस निरीक्षक राहुल गायाकवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जळगाव पोलिसांनी जप्त अंमली पदार्थांचा नियमानुसार नाश करून अंमली पदार्थविरोधी कारवाईतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे.





