
जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे यार्ड तसेच पुणे-दौंड विभागातील विद्यमान रेल्वे मांडणीत (यार्ड मॉडिफिकेशन) आवश्यक बदल करण्यासाठी डीसीएन काम हाती घेण्यात येणार आहे. या विशेष देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे रेल्वेने ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला असून, याचा गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल चार महत्त्वाच्या गाड्यांच्या प्रारंभ व अंतिम स्थानकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
या गाड्यांचे अंतिम स्थानक ‘हडपसर’ असणार
नागपूर-पुणे एक्स्प्रेस, अमरावती-पुणे आणि जम्मूतवी-पुणे एक्स्प्रेस या तीन गाडांना पुणे स्थानकाऐवजी हडपसर येथेच थांबविण्यात येणार आहे. गाडी क्र. १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस १० ऑक्टोबर रोजी नागपूर येथून सुटणारी ही गाडी हडपसर स्थानकात, तर गाडी क्र. ११४०६ अमरावती-पुणे १० ऑक्टोबर रोजी अमरावती येथून सुटणारी ही गाडी हडपसर स्थानकावरच समाप्त करण्यात येईल. याशिवाय गाडी क्र. ११०७८ जम्मूतवी-पुणे एक्स्प्रेस ९ ऑक्टोबर रोजी जम्मूतवी येथून सुटणारी ही गाडी हडपसर स्थानकापर्यंतच असेल.
पुणे-नागपूर एक्स्प्रेस हडपसरवरून सुटणार
गाडी क्र. १२१३५ पुणे-नागपूर एक्स्प्रेस ११ ऑक्टोबर रोजी पुणे स्थानकाऐवजी हडपसर स्थानकातून सुरू करण्यात येईल. ही गाडी हडपसर येथून सायंकाळी ५.४५ वाजता सुटणार आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांची देखभाल, विद्यमान रेल्वे मांडणीत आवश्यक बदल आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हे देखभाल काम महत्त्वाचे आहे. या कामामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.





