
जळगाव लाईव्ह न्यूज । मान्सूनने माघारी फिरल्यानंतर जळगाव शहरसह जिल्ह्यात वातावरणात मोठा बदल झाला असून, सध्या ‘ऑक्टोबर हिट’चा जोरदार तडाखा जाणवत आहे. जळगावमध्ये दिवसा तापमानाचा पारा चढेला असून कडक ऊन पडत आहे, तर सकाळी आणि रात्री वातावरणात हलका गारवा जाणवत आहे.
सध्या जळगावमध्ये दिवसाचे कमाल तापमान साधारणपणे ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे, तर रात्रीचे व पहाटेचे किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. यामुळे सकाळी आल्हाददायक गारवा आणि दुपारी प्रचंड उकाडा अशी विषम स्थिती निर्माण झाली आहे.
दुपारी उष्णता का वाढते?
सकाळनंतर सूर्य वर येताच त्याची किरणे जमिनीवर थेट पडतात, ज्यामुळे जमीन वेगाने तापते. जमिनीच्या संपर्कात येणारी हवा देखील गरम होत असल्याने दुपारच्या सुमारास तापमान झपाट्याने वाढते आणि चटका जाणवू लागला आहे. याउलट प्रक्रिया रात्रीच्या वेळी घडते, ज्यामुळे पहाटे गारवा आणि दुपारी कडक ऊन असा मोठा तापमानातील फरक नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.
पुढील दिवस हवामान कसे राहील?
अंदमान समुद्राकडून येणाऱ्या हवामान प्रणाली सध्या कमकुवत झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघारी परतण्याच्या मार्गावर आहे. जळगावमध्ये सध्या पावसाची शक्यता पूर्णपणे नगण्य आहे. आकाश पूर्णपणे निरभ्र राहणार असल्याने पुढील काही दिवस कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या आसपास कायम राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीनंतर मात्र गुलाबी थंडीची चाहूल लागून वातावरणात अधिक गारवा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





