गुन्हेजळगाव जिल्हा

कुसुंब्यात वीज दुरुस्ती करताना काळाचा घाला ; कंत्राटी वायरमनचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात वीज दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून ३५ वर्षीय कंत्राटी वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. महेश देविदास अपार असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महावितरणच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश अपार हे कुसुंबा गावात वीज दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, वीजपुरवठा बंद करण्याची परवानगी घेतल्यानंतरही विद्युत प्रवाह सुरू कसा झाला? असा सवाल मृत महेश अपार यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. या घटनेला महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच दोषींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महेश अपार यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, तसेच मृताच्या कुटुंबीयांना नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले आहे.

या घटनेमुळे वीज दुरुस्तीच्या कामादरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, चौकशीत नेमका विद्युत प्रवाह कसा सुरू झाला, याचा उलगडा होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button