सप्टेंबर संपण्याआधीच जळगाव तापणार; हवामान विभागाचा मोठा अंदाज, वाचा काय आहे?

जळगाव लाईव्ह न्यूज । सप्टेंबरचा शेवट जवळ येत असतानाच जळगाव शहरासह जिल्ह्यातून मान्सूनने परतीची वाट धरली आहे. पावसाचा प्रभाव कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल जाणवत असून, आता जळगावकरांना ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचू शकते.
पावसाने उघडीप दिल्याने वातावरणातील उकाडा वाढताना दिसत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची माघार सुरू झाल्यामुळे हवेतील आर्द्रता तसेच ढगांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी आकाश निरभ्र किंवा अंशतः ढगाळ राहत असून, सूर्याची किरणे थेट जमिनीवर पोहोचत आहेत.
तापमानात वाढ होण्याची शक्यता
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दिवसा उन्हाचा चटका अधिक जाणवण्याची शक्यता आहे. २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान जळगाव जिल्ह्याच्या कमाल तापमानात वाढ होऊन ते ३५ ते ३६ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
मान्सूनच्या माघारीनंतर सप्टेंबरच्या अखेरीसच तापमानाचा पारा वाढू लागल्याने जळगावकरांना ऑक्टोबर हिटची चाहूल लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत उन्हापासून बचाव करण्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनाही बदलत्या हवामानाचा परिणाम जाणवणार असून, पुढील काही दिवस जळगावच्या हवामानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




