वाळू तस्करांविरोधात जळगाव पोलिसांची धडक कारवाई; १९.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ६ गुन्हे दाखल

ऑगस्ट 23, 2026 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उपसा, साठवणूक आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलिसांना कडक सूचना दिल्यानंतर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाळू तस्करांविरोधात धडक कारवाई सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक धिवरे यांनी स्वतः नदीपात्रात उतरून अवैध वाळू उपसा व साठवणुकीच्या ठिकाणांची पाहणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवघ्या २४ तासांत तब्बल १९ लाख ४९ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

valu

या कारवाईत ४५ ब्रास वाळू, तीन ट्रॅक्टर आणि दोन पिकअप वाहने जप्त करण्यात आली असून, जिल्ह्यातील नशिराबाद, जळगाव तालुका, यावल, रावेर आणि भुसावळ तालुका पोलीस ठाण्यांत एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

तापी नदीपात्राजवळ गायरानात वाळूचा ठिय्या; ट्रॅक्टरसह २६.५ ब्रास वाळू जप्त

नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळगाव येथील तापी नदीपात्राजवळील गायरान भागात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध साठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी स्वराज ट्रॅक्टर, ट्रॉली आणि तब्बल २६.५ ब्रास वाळू असा एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सागर पोपट गोसावी व इतर तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई

जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानेही अवैध वाळू वाहतुकीविरोधात दोन स्वतंत्र कारवाया केल्या. कानळदा ते विदगाव रस्त्यावरील MSEB सब-स्टेशनजवळ सापळा रचून पोलिसांनी पिकअप वाहनांवर कारवाई केली. पहिल्या कारवाईत प्रफुल्ल गुणवंत नेहते याच्याकडून महिंद्रा पिकअप आणि एक ब्रास वाळू, असा ५ लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर दुसऱ्या कारवाईत अज्ञात चालक व मालकाच्या ताब्यातील महिंद्रा लहान पिकअप आणि ०.५ ब्रास वाळू, असा ४ लाख १२ हजार ११५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित वाहनचालक व मालक पसार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

यावलमध्ये ट्रॅक्टरसह वाळू जप्त

यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. नामदेव मुकंदा सोळंके, रा. कोळन्हावी, याच्याकडून स्वराज ट्रॅक्टर आणि एक ब्रास वाळू, असा एकूण ४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा र.नं. ३०१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेरमध्येही वाळू तस्करीला आळा

रावेर पोलीस ठाण्याच्या पथकाने तामसवाडी येथील अनिल साहेबराव रायमळे याच्यावर कारवाई करत स्वराज ट्रॅक्टर आणि एक ब्रास वाळू जप्त केली. या कारवाईत १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्हा र.नं. ४०२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसुलाने जप्त केलेली वाळूच चोरून नेली!

भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकेगाव येथे वाळू चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून पोलीस पाटलांच्या ताब्यात दिलेली १५ ब्रास वाळू, अंदाजे ४५ हजार रुपये किमतीची, संशयित गजानन पंडित जवरे याने रात्रीच्या अंधारात चोरून नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. १५७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त

या सर्व कारवायांचा एकत्रित विचार करता पोलिसांनी एकूण सहा गुन्हे दाखल करून ४५ ब्रास वाळू आणि पाच वाहने जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १९ लाख ४९ हजार ३४५ रुपये आहे.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर यंत्रणा सक्रिय

जिल्ह्यातील नदीपात्र, गायरान आणि विविध मार्गांवरून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः नदीपात्रांची पाहणी केल्यानंतर दिलेल्या सूचनांमुळे स्थानिक पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे या कारवायांतून दिसून येत आहे. अवैध वाळू तस्करीविरोधातील या धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले असून, नदीपात्र आणि वाळू साठवणुकीच्या ठिकाणी पोलिसांची नजर अधिक तीव्र झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now