जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे शिस्तबद्ध पालन व्हावे यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे गुरुवारी (२३ जुलै २०२६) विशेष ‘झिरो फेटॅलिटी’ मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध महाविद्यालय परिसर आणि आकाशवाणी चौक येथे ही धडक तपासणी मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत नियम मोडणाऱ्या तब्बल १७८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत १ लाख ७१ हजार ५०० रुपयांचे ई-चलान फाडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेने विशेषतः अल्पवयीन वाहनचालक, परवान्याशिवाय (लायसन्स) गाड्या चालवणारे आणि सीटबेल्टचा वापर न करणाऱ्यांवर आपले लक्ष केंद्रित केले होते. या कारवाईदरम्यान घटनास्थळी ४ हजार ५०० रुपयांचा रोख दंडही वसूल करण्यात आला आहे.

कारवाईचा तपशील
विना परवाना (लायसन्स) वाहन चालविणारे – ५९
सीटबेल्टचा वापर न करणारे – ३३
अल्पवयीन चालक – ८
ट्रिपल सीट दुचाकी चालविणारे – ११
अवैध प्रवासी वाहतूक – ५
हेल्मेट न वापरणारे – ४
मद्यप्राशन करून वाहन चालविणारे (ड्रंक अँड ड्राईव्ह) – २
इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन – ६१
वाहतूक शाखेचे आवाहन
वाहतूक शाखेने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, तसेच वाहन चालविताना सीटबेल्ट आणि हेल्मेटचा अनिवार्य वापर करावा, असे सांगण्यात आले. रस्ते अपघातमुक्त जळगाव घडविण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.












