जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, घटनास्थळावरून ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, नशिराबाद परिसरातील रोडलगत असलेल्या एका शेतातील घरात वेश्याव्यवसाय सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दुपारी सुमारे २.२० वाजता छापा टाकला.

छाप्यात जावेद उर्फ जानू रोते (वय ५७) आणि कैलास संजय भोंई (रा. नशिराबाद) हे दोघे वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, तेथून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ९१,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गवळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केदार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे व त्यांच्या पथकाने केली.







