जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२६ । गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन जलसाठा अहवालानुसार, जळगाव जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये मिळून सध्या ३७.४५ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांनी शंभरी गाठली असून, दोन धरणांमधील जलसाठा मात्र अद्याप शून्यावर आहे.

जून महिन्यात मान्सूनने ओढ दिल्यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक चिंतेत होते. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, मागच्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने जळगाव जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला असून त्याचा सकारात्मक परिणाम धरणांतील पाणीसाठ्यावर दिसून येत आहे. जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये ३७.४५ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. त्यात जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ३९.४३ टक्के, तर मध्यम प्रकल्पांमध्ये ३८.५५ टक्के, तर लघु प्रकल्पांमध्ये २९.११ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा आणि मंगरूळ ही दोन्ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तर पाल येथील सुकी धरण ८६ टक्के भरले असून तेही पूर्ण क्षमतेकडे वाटचाल करत आहे. दुसरीकडे अग्नावती आणि बोरी या धरणांमध्ये अद्याप जलसाठा नसल्याने परिस्थिती चिंताजनक आहे.
पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या हतनूर धरणातील जलसाठा ४९.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी या धरणात केवळ २१ टक्के जलसाठा शिल्लक होता. जलसाठ्यात झालेल्या वाढीमुळे आज सकाळी हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सध्या ६०.६७ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत दिलासादायक चित्र आहे. मात्र, अर्ध्या जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणात मात्र अवघा २४.४९ टक्के साठा असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
७ जुलै प्रकल्पनिहाय साठा (टक्के)
प्रकल्प आणि जलसाठा
हतनूर : 49.41
गिरणा : 24.49
वाघूर : 60.67
मन्याड : 16.07
बोरी : 0.00
भोकरबारी : 10.41
सुकी : 86.03
अभोरा : 100
अग्नावती : 0.00
तोंडापूर : 1.93
हिवरा : 6.72
मंगरूळ : 100
बहुळा : 24.20
मोर : 61.09
अंजनी : 30.13
गूळ : 40.83
शेळगाव बॅरेज : 39.63








