जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. याच दरम्यान रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा या चार महत्त्वाच्या शहरांतील नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्ग प्रकल्पांतर्गत आता या चारही शहरांमधील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या कामांच्या नियोजनासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

बैठकीत स्थानिक नागरिकांच्या मागण्या आणि शहरांच्या गरजा लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती रक्षाताई खडसे यांनी दिली.

बुऱ्हानपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासमुळे शहरांतील अंतर्गत रस्त्यांच्या विकासावर परिणाम होऊ नये, यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर या समांतर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला मंजुरी मिळाली आहे. या कामांमुळे रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांतील अंतर्गत वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होणार असून, स्थानिक नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे रक्षाताई खडसे यांनी सांगितले.
सध्या बऱ्हाणपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम विविध टप्प्यांमध्ये वेगाने सुरू आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना जोडणारा हा महामार्ग उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भविष्यात या मार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरांतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा या शहरांना वळसा घालणारे बाह्यवळण मार्ग विकसित करण्यात येत आहेत.








