जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । पाचोरा शहरात सध्या नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आगामी मोर्चेबांधणी करण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून चक्क कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. इतकेच नव्हे तर शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाची पायमल्ली केली जात असून त्याकडे स्थानिक प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे.
पाचोऱ्यातील राजकारण सध्या चांगलेच पेटले असून विद्यमान आमदार किशोर पाटील विरुद्ध अमोल शिंदे यांची शाब्दिक चकमक वारंवार पाहायला मिळत आहे. पाचोरा येथे नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या असून त्यादृष्टीने अंतर्गत मोर्चेबांधणी व पक्ष संघटन मजबूत करण्याकडे लक्ष दिले जात आहे. पाचोरा येथील भडगाव रस्त्यावर असलेल्या अटल भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मंगळवारी रात्री आठ वाजता पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली.
एकीकडे स्थानिक प्रशासन व पोलिस गोरगरीब व्यावसायिकांवर नियमानुसार चार वाजता दुकाने बंद करण्याची सक्ती करते आणि नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई करते. दुसरीकडे मात्र भाजपच्या कार्यालयात सुरू असलेला हा नियमबाह्य गोंधळ मात्र नजरेआड केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सक्त सूचना केलेल्या असतानाही हे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत.
जळगाव शहरात विविध पक्षांकडून झालेल्या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन केल्यानंतर गुन्हे दाखल करून पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, पाचोरा शहरात मात्र स्थानिक प्रशासन व पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नगरपालिका निवडणूक कुणाच्या पथ्यावर पडेल हे अद्याप निश्चित नसले तरी या मोर्चेबांधणी बैठकांमुळे कोरोनाचा विस्फोट झाल्यास त्याला स्थानिक पदाधिकारी व नेते जबाबदार असतील हे मात्र निश्चित आहे.