जळगाव पोलिसांचा ‘धुरंधर’ हरियाणाकडे रवाना; विशेष प्रशिक्षणानंतर बनणार गुन्हे शोधक श्वान

जून 19, 2026 11:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या श्वान पथकात नव्याने दाखल झालेला ‘धुरंधर’ हा बेल्जियन मालिनोज जातीचा श्वान आता विशेष प्रशिक्षणासाठी हरियाणातील पंचकुला येथील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्राकडे रवाना झाला आहे.

swanJL

१० नोव्हेंबर २०२५ रोजी जन्मलेला धुरंधर हा सध्या अवघ्या ७ महिने ९ दिवसांचा आहे. गुन्हेगारीचा छडा लावण्यासाठी आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी त्याला ‘गुन्हे शोधक’ म्हणून प्रशिक्षित केले जाणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान त्याच्यासोबत प्रथम हस्तक हेड कॉन्स्टेबल भट्टू पाटील आणि द्वितीय हस्तक पोलीस कॉन्स्टेबल हंसराज देशमुख हे कार्यरत राहतील.

प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत आज्ञाधारकपणा शिकवण्यात येईल. त्यानंतरच्या सहा महिन्यांत वास ओळखण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये ओळख परेड, गुन्हेगाराचा माग काढणे, ड्रॉप अँड फाइंड तसेच विविध वास अचूक ओळखण्याचे कौशल्य विकसित केले जाईल.

देशातील अग्रगण्य श्वान प्रशिक्षण केंद्र

पंचकुला (भानू) येथील ITBP चे प्रशिक्षण केंद्र हे देशातील अत्याधुनिक श्वान प्रशिक्षण केंद्रांपैकी एक मानले जाते. येथे केवळ ITBP साठीच नव्हे, तर विविध केंद्रीय सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांसाठीही उच्च प्रशिक्षित श्वान तयार केले जातात. या केंद्रात गुन्हे शोध, स्फोटके शोधणे, अंमली पदार्थ शोध मोहीम, दहशतवादविरोधी कारवाया, ट्रॅकिंग तसेच वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.

जळगाव पोलिसांसाठी ठरणार मोठी ताकद

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘धुरंधर’ जळगाव जिल्हा पोलिसांच्या गुन्हे तपास पथकासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. गुन्ह्यांचा छडा लावणे, आरोपींचा माग काढणे आणि विविध तपास मोहिमांमध्ये त्याची मदत पोलिसांना होणार असून, त्यामुळे जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्था व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now