जळगाव जिल्हाराजकारण

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 42 शहरांसाठी प्रभारींची नियुक्ती; जळगावात कोणाची निवड?

जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी राज्यातील विविध शहरांसाठी प्रभारी पदांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ‘नवे पर्व, युवा सर्व’ असा थेट संदेश दिला आहे.

या महत्त्वपूर्ण नियुक्त्यांमध्ये जळगाव शहर आणि ग्रामीणची जबाबदारी ॲड. पठाण दानिश हाजी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जळगावच्या राजकीय गणितात आगामी काळात ते हे आव्हान कशा प्रकारे पेलतात आणि पक्षाला किती बळकटी देतात, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यातील ४२ शहरांसाठी प्रभारींची घोषणा
प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी राज्यातील एकूण ४२ शहरांसाठी नव्या प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि तरुणाईला पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी निष्ठावंत आणि अभ्यासू चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

नियुक्त्यांची घोषणा करताना महबूब शेख यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये शुभेच्छा संदेश दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच युवकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून अधिकाधिक युवकांना पक्षाशी जोडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button