जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे जागतिक दूरसंचार दिन दिनांक 17 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागांतर्गत टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाचा विषय होता डिजिटल लाइफ लाईन : स्ट्रेंगथनिंग रेसिलियन्स इन ए कनेक्टेड वर्ल्ड.जो संपूर्ण कार्यक्रमात प्रभावीपणे प्रतिध्वनित झाला.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी व विभाग प्रमुख डॉ. हेमंत इंगळे हे उपस्थित होते त्यांच्यासोबत विभागातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी दूरसंचार क्षेत्राचा इतिहास, ५जी तंत्रज्ञान, उपग्रह संप्रेषण, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), आणि डिजिटल भविष्य यासारख्या विविध विषयांवर प्रभावी भाषणे दिली. त्यांचे विचार नवे दृष्टिकोन आणि सखोल समजून घेण्याचे प्रतीक होते.

भाषण करणारे विद्यार्थी:
मार्गेश वाघ, ऋतुजा ठेंग, यश धनगर, पावबा पाटील, प्राजक्ता पाटील, तुळजा महाजन व प्रणव थोरात यांनी दूरसंचार तंत्रज्ञानाच्या भविष्यावर विचारमंथन केले.
डॉ. हेमंत इंगळे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात दूरसंचार हे आधुनिक डिजिटल युगाचे बळकट आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग क्षेत्रातील दूरसंचारच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून या क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद केले. तसेच विद्यार्थ्यांनी संशोधन व नवोपक्रमाच्या माध्यमातून संस्थेसाठी उपग्रह (Satellite) निर्मितीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना 5G, वायरलेस कम्युनिकेशन, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) आणि आधुनिक दूरसंचार क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. “तंत्रज्ञानाच्या बळावर विद्यार्थी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देऊ शकतात,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमातून केवळ दूरसंचार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित झाले नाही, तर भविष्यातील टेलिकॉम क्षेत्रातील नेतृत्व घडवण्यासाठी एक दिशादर्शक मंच म्हणून त्याची नोंद झाली. डिजिटल समावेश, तंत्रज्ञान सक्षमीकरण आणि कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली. आजच्या परस्परसंबंधित जगात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय ही संस्था भविष्यातील डिजिटल भारताचे सक्षम अभियंते घडवण्यासाठी सातत्याने योगदान देत आहे.कार्यक्रमाचे नियोजन प्रा. आर.व्हि. पाटील सर यांनी केले व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कीर्ती बोरोले या विद्यार्थिनीने केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. अनिकेत पाटील सर यांनी कौतुक केले.







