जळगाव मनपा महासभा वादळी; विविध विकासकामांचे मुद्दे आणि प्रशासकीय दिरंगाईवरून जोरदार खडाजंगी

मे 14, 2026 7:30 PM

जळगाव: जळगाव महानगरपालिकेची आज झालेली महासभा प्रचंड वादळी ठरली. विविध विकासकामांचे मुद्दे आणि प्रशासकीय दिरंगाईवरून सत्ताधारी नगरसेवकांमध्येच जोरदार खडाजंगी झाल्याने सभागृहात बराच वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, व्यासपीठावरच महापौर आणि उपमहापौरांमध्ये चकमक उडाल्याचे आज पाहायला मिळाले.

jalgaon manapa

मेहरूण परिसरातील ३० मीटर रस्त्याच्या फेरआखणीचा विषय चर्चेला आला असता, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने हा विषय तहकूब करण्याची मागणी भाजप नगरसेवक दीपक सूर्यवंशी यांनी केली. महापौर दीपमाला काळे यांनी याला सहमती दर्शवली. मात्र, शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी यावर तीव्र हरकत घेतली. “भाजप एकतर्फी निर्णय घेत आहे,” असा आरोप करत भंगाळे अत्यंत आक्रमक झाले आणि बोलता बोलता थेट सभागृहाच्या लॉबीपर्यंत पोहोचले. अखेर या विषयात शिवसेना तटस्थ राहील, असे त्यांनी जाहीर केले.

उपमहापौरांनी सोडले व्यासपीठ!
महासभेत खरा हायव्होल्टेज ड्रामा तेव्हा घडला, जेव्हा उपमहापौर मनोज चौधरी यांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडण्यासाठी वेळ मागितला. यावरून महापौर दीपमाला काळे यांच्याशी व्यासपीठावरच त्यांची शाब्दिक चकमक झाली. यामुळे संतप्त झालेल्या उपमहापौरांनी थेट व्यासपीठ सोडले आणि ते नगरसेवकांच्या बाकांवर येऊन बसले. त्यांनी शहरातील रस्ते, स्वच्छता आणि प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजावर आक्रमकपणे प्रश्न उपस्थित केले.

“माझ्या सूचनांकडे जर असेच दुर्लक्ष होणार असेल, तर मी पुढील महासभेला उपस्थित राहणार नाही,” असा गर्भित इशाराही उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिला.

ठाकरे गटाचे भाजपला समर्थन; राजकीय चर्चांना उधाण
एकीकडे सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला असताना, विरोधी बाकांवरील शिवसेना (ठाकरे गट) ने मात्र या वादात भाजपच्या भूमिकेला समर्थन दिले. ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे मनपाच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे.

प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी संघर्ष कायम
अॅटलांटा महापालिका फसवणूक प्रकरणावरून महापौर दीपमाला काळे आणि भाजप नगरसेवकांनी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना चांगलेच खडे बोल सुनावले. भाजप नगरसेवक अमर जैन यांनी शहरातील वाढत्या अपघातांचा मुद्दा उपस्थित करत विविध चौकांतील सर्कल लहान करण्याची मागणी केली. या संपूर्ण विषयांवरून आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि नगरसेवकांमध्येही तीव्र शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे महापालिकेतील ‘प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी’ हा संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

‘महायुतीत’ मतभेद नाहीत: महापौर-उपमहापौर
सभागृहात एवढा मोठा हायड्रॉमा आणि वाद उफाळल्यानंतरही, महासभेच्या शेवटी महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी सारवासारव केली. “आमच्यात वैयक्तिक काहीही वाद नसून, महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत,” असा दावा दोघांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now