महाराष्ट्र्रातील या जिल्ह्यांत २ दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; जळगावात कशी राहणार स्थिती?

मे 7, 2026 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२६ । गेल्या काही दिवसापासून जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तडाख्याने नागरिक होरपळून निघत आहे. राज्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान आता हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आगामी दोन दिवस राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

rain

या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेल्याची नोंद झाली. वर्धा, अमरावती, गडचिरोली, अकोला, वाशीम, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे तीव्र उष्णतेची लाट जाणवली. तसेच सोलापूर, परभणी आणि यवतमाळ येथे तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक नोंदवण्यात आले. महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारनंतर राज्यातील हवामान पुन्हा कोरडे होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जळगावात पुढील दोन दिवस ‘उष्णता आणि पावसाचा खेळ’

जळगाव शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे काही काळ उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी पुढील दोन दिवस हवामान संमिश्र राहण्याची शक्यता आहे. ७ आणि ८ मे रोजी तापमानात फारशी घट होण्याची शक्यता नसून तीव्र उष्णता कायम राहणार आहे. आकाशात आंशिक ढगाळ वातावरण राहील, त्यामुळे हवेत आर्द्रता वाढून उकाडा अधिक जाणवू शकतो. दुपारनंतर किंवा सायंकाळी काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच वायव्य दिशेकडून मध्यम वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस जळगावकरांना उष्णता, उकाडा आणि अधूनमधून पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now