जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात पती-पत्नीच्या वादातून हत्येची एक थरारक घटना समोर आली आहे. दारू पिऊन वारंवार त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीने गळा आवळून खून केल्याची घटना कानळदा रस्त्यावरील केसी पार्क परिसरात घडली. भरत नामदेव पाटील (५८, रा. केसी पार्क) असं मयत पतीचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी पत्नी मनीषा भरत पाटील (५०) हिच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

नेमकी घटना काय?

कानळदा रस्त्यावरील केसी पार्क परिसरातील भरत पाटील हे पत्नी व दोन मुलांसह राहत होते. त्यांची पत्नी एका कापड दुकानात तर दोघं मुलं एमआयडीसीत कंपनीत कामाला होते. भरत पाटील हे दररोज दारुच्या नशेत पत्नीसह मुलांना त्रास देत होते. मंगळवारी (५ मे) रात्री ९ वाजता मनिषा पाटील या कामावरुन घरी परतल्या त्यावेळी पती दारुच्या नशेत घराच्या ओट्यावर बसलेला होता. त्या वेळी त्याने पुन्हा दारुच्या नशेत पत्नीसोबत वाद घातला.
यादरम्यान, पती व पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात मनिषा पाटील यांनी पती भरत पाटील याचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळला व पलंगावरून त्यास खाली ओढले. त्या वेळी जमीनीवर डोके आपटले गेले कानातून, नाकातून मोठा रक्तस्त्राव झाला. लगेचच परिसरातील एका तरुणाने भरत पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांसह पोलिसांनी मयत भरत पाटील यांच्या शरिराची पाहणी केल्यानंतर त्यांच्या मानेवर गळा आवळल्याचे व्रण दिसले. त्यामुळे पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला.
सुरुवातीला या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी सुमारास भरत पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावरुन भरत पाटील यांचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
पोलिसी खाक्या दाखवताच संशयित आरोपी मनीषा पाटील हिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. दारुच्या आहारी गेलेल्या पतीकडून वारंवार त्रास दिला जात होता. त्याला कंटाळून संतापाच्या भरात गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या प्रकरणात नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










