जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा असह्य होत असून शनिवारी जिल्ह्याचे तापमान ४३.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. हवेतील आर्द्रता कमालीची घटल्याने आणि उत्तर भारतात सक्रिय असलेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे जळगावकर अक्षरशः होरपळून निघत आहेत. दरम्यान, येत्या २८ एप्रिलपर्यंत तापमानातील ही तीव्रता अशीच कायम राहणार असून उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. त्यामुळे जळगावकरांसाठी आगामी तीन दिवस अत्यंत महत्वाचे राहणार आहे.

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मे महिन्यात जाणवणारा हिटचा तडाखा एप्रिलमध्येच जाणवत आहे. तापमानाचा पारा वाढल्याने वाढत्या उष्णतेने जळगावकर होरपळून निघत आहे. विशेष म्हणजे, केवळ दुपारीच नव्हे, तर आता सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

सकाळी नऊपासून सुरू होणारा उन्हाचा तडाखा दुपारी १२ वाजेपर्यंत इतका तीव्र होतो की, घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. दुपारच्या सुमारास उकाड्याची तीव्रता प्रचंड वाढत असल्याने बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून, उष्णतेच्या झळा सायंकाळपर्यंत कायम राहत आहेत. केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ झाली आहे. हवेतील आर्द्रता घटल्याने रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवत असून, नागरिकांची झोप उडाली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील ७२ तास जळगावकरांसाठी महत्त्वाचे असणार आहे. येत्या २८ एप्रिलपर्यंत तापमानाचा पारा ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
आगामी तीन दिवस असं राहणार तापमान?
२६ एप्रिल: कमाल तापमान ४३ ते ४४ अंशांच्या दरम्यान राहील.
२७ एप्रिल: पारा ४२ ते ४४ अंशांच्या आसपास स्थिरावेल.
२८ एप्रिल: तीव्र झळा कायम राहतील, तापमान ४२ ते ४३ अंश राहण्याची शक्यता आहे.
वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि सुती कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







