⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | संकटमोचकांच्या ‘महाजन’कीचा करिष्मा संपतोय?

संकटमोचकांच्या ‘महाजन’कीचा करिष्मा संपतोय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । एकेकाळी जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे संकटमोचक म्हणून ओळख निर्माण केलेले माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचा करिष्मा सध्या संपतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाजन युगाचा अस्त होतोय असे म्हणण्यामागील कारण ही तसेच आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी गिरीश महाजनांविरुद्ध एक शब्दही उच्चरण्याची हिंमत नसलेले आज चक्क त्यांच्या विरोधात बंड पुकारून सत्तेत बसले आहेत तर दुसरीकडे आपल्यावर महाजन यांचा हात असल्यावर कोणीच काही वाकडे करुन घेणार नाही अशा अविर्भावात वागणाऱ्यांभोवती बीएचचारचा फास घट्ट आवळला जात आहे.

जळगाव जिल्ह्याचे नव्हे राज्याचे नेते संकटमोचक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे विश्वासू माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बसवलेली घडी आता विस्कळीत होऊ लागली आहे. गिरीश महाजन यांनी जळगाव आणि धुळे मनपात सत्ता काबीज केली. राज्यातील अनेक निवडणुकांची जबाबदारी त्यांनी यशस्वी पार पाडली. विधानसभा निवडणुकीतही त्यांची मोलाची भूमिका होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची अत्यंत विश्वासू व्यक्ती म्हणजे गिरीश महाजन अशी ओळख निर्माण झाली होती. सर्व काही योग्य पद्धतीने सुरू असताना सत्तेची समीकरणे बिघडली आणि भाजपच्या हातून सत्ता गेली. सत्ता गेल्याने गिरीश महाजन यांचे मंत्रिपद गेले.

उत्तर महाराष्ट्रात नाथपर्व संपत गिरीराज युगाचा उदय झाला होता. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेला शब्द अंतिम समजला जात होता. गिरीश महाजन हे देखील त्याच अविर्भावात होते पण अचानक काळ बदलला आणि जे कधी गिरीश महाजन यांच्यासमोर उभेही राहू शकत नव्हते त्यांनी चक्क त्यांच्या विरोधात बंड पुकारले. जळगाव शहरातील एका नगरसेवकाने महाजन यांच्या विरोधात जाऊन भाजपचे नगरसेवक फोडले आणि शिवसेनेचा महापौर मनपात बसला.

संपूर्ण घडामोडीत गिरीश महाजन यांची पूर्णतः चूक नसली तरी जळगाव शहराकडे त्यांनी पुरेसे लक्ष न दिल्याने इतर पदाधिकाऱ्यांना नगरसेवक व कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जबाबदारी पार पाडता आली नाही हे मात्र सिद्ध झाले. जळगाव मनपातील चाव्या शिवसेनेच्या हातात येताच त्यांनी राज्यातील सत्तेचा उपयोग करून कामांना सुरुवात केली, अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. गिरीश महाजन यांनी दिलेला वर्षभरात कायापालट करण्याचा वादा हवेत विरला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाजन विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांच्यासाठी मत मागायला कुठल्या तोंडाने जाणार हा मोठा प्रश्न आहे.

एकीकडे जळगावातील सत्ता गेली तर दुसरीकडे नाशिक मनपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तेथील सूत्रे माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या हाती दिली. गिरीश महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्काच आहे. ज्याप्रमाणे जळगावात पदाधिकारी सांभाळता आले नाही तशी स्थिती नाशिकमध्ये होऊ घातली होती. भाजपचा पायउतार होऊ नये म्हणून पक्षाने वेळीच खबरदारी घेत मनपा निवडणुकीपूर्वी गिरीश महाजन यांना बाजूला सारले.

गिरीश महाजन आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपल्याला काहीच होऊ शकत नाही अशा अविर्भावात काही उद्योजक, पदाधिकारी, व्यावसायिक आणि कार्यकर्ते वावरत होते परंतु गेल्या दोन महिन्यातील नाट्यमय घडामोडी लक्षात घेतल्या तर वाळू गट प्रकरण असो किंवा बीएचआर प्रकरण अथवा जामनेरचे व्यापारी संकुल प्रकरण असो गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्यांवरच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. बीएचआरमध्ये तर अनेक दिग्गज अडकले आहेत. एक आमदार देखील यात अडकण्याची शक्यता असून तो गिरीश महाजन यांच्या जवळचा असल्याची चर्चा आहे.

एकंदरीत गिरीश महाजन यांच्या करिष्मा संपुष्टात येतो की काय असे आज वाटू लागले आहे. राज्यात पुन्हा भाजप-सेनेची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या असून तसे झाल्यास महाजनांच्या जादूची कांडी पुन्हा कार्यान्वित होईल यात शंका नाही.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.