Jalgaon : आज जिल्हाभर ‘ग्रामपंचायत बंद’चे आंदोलन; नेमकं कारण काय? घ्या जाणून

फेब्रुवारी 20, 2026 11:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२६ । जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायती संबंधित महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज ग्रामपंचायती शुक्रवारी 20 फेब्रुवारीला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण जिल्ह्यातील तब्बल ७८३ ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कार्यकाळ संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र निवडणुका न घेता थेट प्रशासक नेमण्याच्या निर्णयाविरोधात विद्यमान सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाभर ‘ग्रामपंचायत बंद’चे आंदोलन करण्यात येणार आहे.

gramp

डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत टप्याटप्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. पहिल्या टप्प्यात झालेल्या ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांमुळे पुढील ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित राहिल्या. त्यामुळे प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात प्रशासक नेमण्याचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे.

सरपंच संघटनांचे म्हणणे आहे की, निवडणुका जाहीर होईपर्यंत विद्यमान सरपंच व उपसरपंचांकडेच कारभाराची जबाबदारी द्यावी. गावपातळीवरील विकासकामे, शासकीय योजना व दैनंदिन प्रशासनाची सलगता राखण्यासाठी हा पर्याय अधिक योग्य ठरेल, असा त्यांचा दावा आहे.

दरम्यान, राज्यभर ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरू असली तरी नियमित निवडणुकांच्या कार्यक्रमाबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम वाढला आहे. प्रशासक नियुक्तीच्या निर्णयामुळे गावपातळीवर राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसांत याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now